Sunday, September 19, 2010

शेवटचे दिवस

नाव वाचून घाबरू नका.. आयुष्यातील नव्हे तर सायप्रसच्या वास्तव्यातील शेवटचे दिवस आहेत हे....

परवा सहज मोकळा वेळ मिळाला आणि आठवणींचे ढग दाटून आले. सायप्रस मधील माझे वास्तव्याचे दिवस संपत आले होते आणि मला अजून एक पोस्ट लिहायचे स्फुरण चढले होते.

४ महिन्याआधी मी नवीन कंपनीत रुजू झालो आणि मला लगेचच सायप्रसला जाण्याची संधी मिळाली. हा माझा पहिलाच परदेश प्रवास. त्यामुळे फारच उत्साही होतो मी. सर्व कागदपत्रे गोळा करून झाली आणि मला शेवटी एकदाचा विसा मिळाला. मग मात्र मी जोमाने तयारीला लागलो. नवीन कपडे घेतले, औषधे, खाण्याच्या गोष्टी आणि इतर बरेच काही अशी माझी तयारी झाली आणि २९ जूनचा दिवस उजाडला. ऑफिस मध्ये जाऊन सर्व गोष्टींची पूर्तता केली आणि संध्याकाळी गाडीने अंधेरी (मुंबई) गाठले. माझे विमान 30 जूनला पहाटेचे होते म्हणून मग अंधेरी मध्ये हॉटेलमध्ये मुक्काम केला. माझे सर्व नातेवाईक मला भेटायला आले होते.

पहाटे लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठले आणि सर्व सोपस्कार पार पाडून मी आतमध्ये गेलो. आत मध्ये सर्व गोष्टी बघून झाल्या आणि मी विमानात बसलो. सायप्रसला थेट विमान नाही भारतातून म्हणून माझे विमान अबूधाबी येथे बदलावे लागणार होते. त्यानिमित्ताने मला मात्र अबुधाबी विमानतळ बघायची संधी मिळाली. अबुधाबी विमानतळ देखील छान आहे. नंतर दुसरे विमान पकडून मी सायप्रसला(लारनाका) आलो. taxi माझी वाटच बघत होती आणि मी शेवटी एकदा लीमासोलला पोहोचलो.

माझे हॉटेल शानदार आहे. मागेच समुद्र आहे आणि बाकी बऱ्याच सोयी आहेत. सुरुवातीच्या काही दिवसात भरपूर फिरून घेतले. लेडी माईल बीच, कुरियन बीच, गव्हर्नर बीच, टोर्दूस पर्वतरांग, agia napa आणि बरेच काही. हळूहळू माझे कामहि चालू झाले होते. नंतर मात्र कामात गुंतून गेलो आणि फिरणे कमी झाले. सायप्रस हा तसा छोटा देश असल्यामुळे बर्याचश्या गोष्टी बघून झाल्या होत्या. सुरुवातीला मी माझ्या मायभूमीला विसरूनच गेलो होतो.
september महिना उजाडला आणि एकएक सण सुरु झाले. श्रावण महिना तर संपलाच होता , दहीहंडी, गणेशोत्सव अश्या गोष्टींना मात्र मी miss करायला लागलो होतो. त्याशिवाय चहाची टपरी (मला चहाचे व्यसन आहे असे समजा हवे तर), पानाची टपरी, मित्र आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मान्सून अश्या अनेक गोष्ट्यींना मी येथे मुकत आहे हि जाणीव व्हायला सुरुवात झाली होती आणि माझी उलटी गिनती पण चालू झाली होती.

असो. २४ तारखेचे माझे तिकीट बुक झालेले आहे आणि मी लवकर परत येणार आहे. मग भेटू पुन्हा इतक्यातच.

Friday, September 17, 2010

मी आणि सिगारेट

हो... हे खरे आहे... हा ब्लॉग म्हणजे बऱ्याच जणांना धक्का आहे हे मला माहित आहे पण हे खरे आहे. कधीपासून, किती असे मुद्दे इथे आता गौण ठरतात.

सिगारेट हि शरीराला घातक आहे आणि मी तिचे अजिबात समर्थन करत नाहीये पण माणसाला एकतरी वाईट सवय असावी ना... म्हणजे मग नजर लागत नाही. :-)

पण खरच मनापासून सांगतो सिगारेट हि माझी खरी साथीदार आहे. कुठलाही प्रसंग असो ती माझी साथ सोडत नाही. आणि खरेतर सिगारेट पिण्यासाठी कुठलेही बंधन नाही. कुठेही, कधीही, केव्हाही तुम्ही तिचा आस्वाद घेऊ शकता. दारूसारखी मेहफिल लागत नाही हिला.

मी तरी एकटे असताना सिगारेट पिणे पसंत करतो. मला कोणी बरोबर असलेले आवडत नाही. कोणी असलेच तरी एखाद दुसरा. जास्त माणसे नकोत. सिगारेटच्या साथीत असताना खरे तर दुसऱ्या कोणाच्या सोबतीची गरजच लागत नाही. प्रत्येक कश बरोबर एक एक विचार मनात डोकावतो. ऑफिस मधला ताण-तणाव, कामाचे प्रेशर आणि अजून सतराशे साठ भानगडी. मनात येणाऱ्या विचारांना कोणतेही बंधन उरत नाही मग.

प्रत्येक कश सोबत एक एक विचार मनात येतात आणि बाहेर सोडल्या जाणाऱ्या धुराबरोबर निघून जातात. मन कसे एकदम शांत होते मग. कोणतेही विचार मनात रहात नाहीत आणि पुन्हा एकदा मन नवीन विचारांकरता मोकळे होऊन जाते. आणि मग ह्या रिकाम्या डोक्यात तेच तेच फालतू विचार न येता काहीतरी नवीन आणि चांगले विचार यायला सुरुवात होते. ह्या शांत मनातूनच अडलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळत जातात. सिगारेट संपता संपता ती माझ्या मनातील जुने विचार काढून टाकते आणि सगळ्या प्रश्नाची उत्तरे देऊन जाते. कधी कधी डोक्यात खूप विचारांचे काहूर माजलेले असते तेव्हा मात्र मग एकीवर भागत नाही. शेवटी तिलाहि लिमिट आहेतच.

पण आजकाल मात्र सिगारेट पिणे हि एक style झाली आहे. लोकांना दुसरयासमोर बढाई मारायला हवी असते म्हणून ते सिगारेटचा आधार घेतात. अश्या लोकांची मात्र मला कीव येते. उगाच आपले माझ्यासारख्यांचे नाव बदनाम करतात. सिगारेट न ओढणारे मात्र सिगारेट ओढण्याला भयंकर नावे ठेवतात. त्यांचे काही चूक नाही म्हणा, सिगारेटच्या पायी तरुण पिढी बिघडत चालली आहे हे मात्र खरे आहे.

पण काहीही असो. सिगारेट स्वतः जळून माझ्या मनाला मात्र नवीन जीवन देऊन जाते आणि म्हणूनच तिला माझा मनःपूर्वक सलाम.